७६ वर्षानंतर सांगोला तालुक्यातील डोंगरी भागाला मिळाला न्याय – आमदार शहाजीबापू पाटील

डोंगरी विभाग विकास कार्यक्रमांतर्गत सांगोला तालुक्यातील आठ गावांचा समावेश –

सांगोला प्रतिनिधी – रवीराज शेटे

Advertisement
): डोंगरी विभागांचा विकास करण्यासाठी या भागाचे प्रश्न समजून घेण्याच्या उद्देशाने तसेच राज्यातील डोंगरी विभागाचे क्षेत्र विशिष्ट निकषांच्या आधारे निश्चित करुन त्यांच्या विकासासाठी खास कार्यक्रम घेण्याच्या हेतूने मंत्रिमंडळाची उपसमिती नेमली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आमदार शहाजीबापू पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याने सांगोला तालुक्यातील नराळे, कोळा, गुणाप्पावाडी, डिकसळ, तिप्पेहाळी, कोंबडवाडी, किडेबिसरी, पाचेगाव बु. या आठ गावांचा डोंगरी क्षेत्रामध्ये समावेश करण्यात आला आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तब्बल ७६ वर्षानंतर सांगोला तालुक्यातील डोंगरी भागाला न्याय मिळाला असल्याची माहिती आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली.
राज्यातील सर्व विभागांचा समतोल विकास करीत असताना डोंगरी विभागाच्या काही विशिष्ट गरजा असल्याचे आढळून आले आहे. डोंगरी विभागाचे क्षेत्र विशिष्ट निकषांच्या आधारे निश्चित करुन त्यांच्या विकासासाठी खास कार्यक्रम घेण्याच्या हेतूने मंत्रिमंडळाची उपसमिती स्थापन केली होती. सांगोला तालुक्यात डोंगरी भागाचे क्षेत्र जास्त असून स्वातंत्र्य मिळाल्यापासून विकासकामांकडे सातत्याने दुर्लक्ष झाले होते. त्यामुळे डोंगरी भागाला न्याय देण्यासाठी तसेच या भागातील विकासकामांना प्राधान्य देण्यासाठी सांगोला तालुक्यातील डोंगरी भाग असलेल्या गावांचा समावेश करावा अशी मागणी आमदार शहाजीबापू पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. सातत्याने पाठपुरावा केल्याने आमदार शहाजीबापू पाटील यांच्या प्रयत्नाला यश आले असून तब्बल ७६ वर्षानंतर सांगोला तालुक्यातील नराळे, कोळा, गुणाप्पावाडी, डिकसळ, तिप्पेहाळी, कोंबडवाडी, किडेबिसरी, पाचेगाव बु. या आठ गावांचा डोंगरी क्षेत्रामध्ये समावेश करण्यात आला आहे.
डोंगरी विभाग विकास कार्यक्रमातर्गत एक ते दोन वर्षात पूर्ण होणारी अंदाजित २५ लाख रुपयांची कामे करण्यात येणार आहेत. रस्ता काँक्रीटीकरण, खडीकरण व डांबरीकरण, अंगणवाडी इमारतीचे बांधकाम व दुरूस्ती, अंगणवाडी इमारत भोवती संरक्षक भिंत बांधणे, अंगणवाडीसाठी नाविन्यपूर्ण वर्ग खोली बांधणे, शैक्षणिक साहित्य पुरविणे, डिजिटल वर्ग खोली बांधणे, शासकीय प्राथमिक शाळांच्या नवीन खोल्यांचे बांधकाम व दुरुस्ती, शासकीय प्राथमिक शाळांची दुरुस्ती, शासकीय प्राथमिक शाळांच्या इमारत भोवती संरक्षक भिंत बांधणे, शासकीय प्राथमिक शाळांना नाविन्यपूर्ण वर्ग खोली बनविण्याकरीता शैक्षणिक साहित्य पुरविणे, डिजिटल वर्ग खोली बांधणे, पाटबंधाऱ्याची कामे, कोल्हापूर पध्दतीचे बंधारे, लघु पाटबंधारेची कामे, उपसा जलसिंचन योजना, रस्ते विकासाची कामे, छोटे पूल, रस्त्यावरील मोरीची कामे, लहान नाल्यावर फरशी टाकणे, पाणी पुरवठ्याची कामे, ग्रामीण पाणी पुरवठ्याच्या लहान लहान योजना, वाड्यावस्त्यांसाठी जादा पाईपलाईन टाकून वाड्यांना पाणी पुरवठा करण्यासंबंधीची कामे, गावासाठी, वाड्यांसाठी विंधन विहिरी, समाज मंदिरे, सामाजिक सभागृहे, उपसा जलसंचिन योजना व त्याच्या दुरुस्त्या, एस.टी. निवारा (पिकअप शेड), सौर ऊर्जेवरील दिवे, विद्युत विकासाची कामे करण्यात येणार असल्याची माहिती आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page