घेरडी प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणजे एक ना धड भाराभर चिंध्या ; तालुक्यातील नेते मंडळी करीत आहेत दुर्लक्ष

प्रतिनिधी – चाँदभैय्या शेख – सांगोला तालुक्यातील घेरडी हे गाव नेहमीच गजबलेलं ठिकाण. परिसरातील लोक या ना त्या कारखाने व आठवडी बाजारासाठी तसेच इतर कामांसाठी येथे येतात. या बरोबरच हे ठिकाण मध्यवर्ती असल्याने येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेण्यासाठी रुग्णांची रीघ लागलेली दिसून येते. मात्र, हे प्राथमिक आरोग्य केंद्र हे रुग्णांसाठी “एक ना धड भाराभर चिंध्या ” ‘असून अडचण, नसून खोळंबा’ अशा अवस्थेत आहे. येथे कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. तर येथे येणारे वैद्यकीय अधिकारी हे तात्पुरत्या कालावधीसाठी येत असून, कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी नसल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रास वाली कोण? अशी संतप्त प्रतिक्रिया रुग्णांमधून व्यक्त केली जात आहे. गेल्या महिन्यांपासून केंद्रात कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी नाहीत. या काळात तात्पुरत्या नेमणुका होत असून, बऱ्याचवेळा वैद्यकीय अधिकारी उपलब्धच नसतात. त्यामुळे आज डॉक्टर भेटतील का? या विवंचनेतच रुग्णांना यावे लागत आहे.विशेषतः गाव परिसरातील तसेच वाड्या-वस्त्यांवरील दररोज सरासरी १०० ते १५० रुग्ण येत असतात बऱ्याचदा डॉक्टर नसल्याने गरोदर मातांचे खूप हाल होतात. डॉक्टरांअभावी रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.या केंद्रात कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी मिळणार का? अशी विचारणा होत आहे.घेरडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य अधिकारी या आरोग्य केंद्रात वेळेवर उपस्थित राहत नसल्याने रुग्णांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत आहे. सायंकाळनंतर निवासी आरोग्य अधिकारीही या आरोग्य केंद्राकडे फिरकत नसल्याने हे घेरडी आरोग्य केंद्र केवळ शोभेचे बाहुले बनले आहे.या आरोग्य केंद्रात आलेल्या रुग्णांवर उपचारांबाबत रात्रीच्या वेळी तर ड्युटीवरील नर्सला आरोग्य अधिकारी फोनद्वारे मार्गदर्शन करीत असल्याचा धक्कादायक प्रकार या आरोग्य केंद्रात घडत असल्याने अशा प्रकारच्या उपचारांतून आरोग्य अधिकारी रुग्णांच्या जिवाशीच खेळ करीत असल्याचा प्रकार स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आला आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य अधिकाऱ्यांचा हा सावळागोंधळ जिल्हा व तालुका आरोग्य यंत्रणेकडूनही दुर्लक्षित होत आहे.गेल्या काही महिन्यांपासून या आरोग्य केंद्रातील उपचार बेभरवशाचे झाले आहेत. या आरोग्य केंद्रात दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक असताना रुग्णांना वेळेवर वैद्यकीय उपचार मिळत नसल्याचा आरोप सर्व सामान्य नागरिक करीत आहेत . घेरडी आरोग्य केंद्रात पुरेसे कर्मचारी मिळावेत, निवासी न राहणाऱ्या आरोग्य अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी व त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून पुढे येत आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page