लोकसभा निवडणूक हातून निसटत असल्याने मोदी घाबरले – राहुल गांधी

राहुल गांधींच्या सभेचे वादळ सोलापुरात घोंगावले ! राहुल यांच्या सभेला तुफान गर्दी
सोलापूर प्रतिनिधी – आण्णासाहेब खरात
देशातील ९० टक्के जनतेच्या कल्याणासाठीचा पैसा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २५ उद्योगपतींना दिला आहे. परंतु देशातील जनता आता मोदींना पुरती ओळखली आहे. म्हणूनच मोदी घाबरले आहेत. लोकसभा निवडणूक त्यांच्या हातातून निसटत आहे. म्हणूनच ते पुन्हा पाकिस्तान, दोन समाजामधील द्वेषाची, खोटेपणाची भाषा वापरत आहेत, अशा शब्दात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. सोलापूर व माढा लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या प्रचारासाठी सोलापुरात आयोजित जाहीर सभेत राहुल गांधी बोलत होते. दुपारी तळपत्या उन्हात लक्ष्मी मिल मैदानावर झालेल्या या सभेस हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता.
मोदींनी २२ अब्जाधीश बनविले, आम्ही कोट्यवधी गरिबांना लखपती बनविणार!

सोलापुरात राहुल गांधी यांचा घोषणांचा वर्षाव
सोलापूर : महालक्ष्मी योजनेच्या माध्यमातून देशातील सर्व गरीब कष्टकरी महिलांच्या खात्यात दरवर्षी एक लाख रुपये टाकणार. तसेच श्रीमंतांच्या मुला-मुलींप्रमाणे प्रत्येक पदवीधर मुलाला अप्रेंटिशशीपचा अधिकार मिळवून देणार, हे करताना त्यांना वर्षाला लाख रुपयेही देणार आहे. मोदींनी या देशात केवळ २२ अब्जाधीश बनविले. मात्र आम्ही देशात आता कोट्यवधी लखपती बनविणार आहोत. केंद्रात आमचे सरकार येताच शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा निर्णय घेतला जाईल, शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव देण्याचा निर्णय घेतला जाईल अशा अनेकानेक घोषणांचा वर्षाव काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी सोलापूरच्या सभेत केला.
सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ बुधवारी राहुल गांधी यांची जाहीर सभा पार पडली. यावेळी राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. नरेंद्र मोदींनी आपल्या अब्जाधीश मित्रांचे 1,60,00,00,00,00,000 रुपयांचे म्हणजेच 16 लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ केले आहे!
१६ लाख कोटी रुपयांमध्ये काय होऊ शकत

Advertisement
-16 कोटी तरुणांना वर्षाला एक लाख रुपयांच्या नोकऱ्या मिळाल्या असत्या
-16 कोटी महिलांना वर्षाला 1 लाख रुपये देऊन त्यांच्या कुटुंबीयांचे जीवन बदलू शकले असते.
-10 कोटी शेतकरी कुटुंबांचे कर्ज माफ करून असंख्य आत्महत्या रोखता आल्या असत्या.
-संपूर्ण देशाला 20 वर्षांसाठी फक्त 400 रुपयांत गॅस सिलिंडर देता येईल, असेही राहुल गांधी यावेळी म्हणाले. दरम्यान, काँग्रेस सत्तेत आल्यावर कोणकोणत्या योजना राबवणार याचीही माहिती दिली.
यावेळी व्यासपीठावर महविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, उज्वलाताई शिंदे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, माढा मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, धर्मराज काडादी, निवडणूक प्रमुख प्रकाश यलगुलवार, चेतन नरोटे, माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, दिलीप माने, नरसय्या आडम मास्तर, शिवसेना नेते अजय दासरी, आमदार वझाहत मिर्झा, वंचितचे उमेदवारी अर्ज मागे घेतलेले राहुल गायकवाड, उत्तमराव जानकर , भगीरथ भालके, अभिजित पाटील, सुरेश हसापूरे, बाबा मिस्त्री, विश्वनाथ चाकोते, जिल्हा अध्यक्ष नंदकुमार पवार, महेश कोठे, सुधीर खरटमल, आम आदमी पार्टीचे एम पाटील, समाजवादी पार्टीचे अबू तालिब डोंगरे, मनोहर सपाटे, मनोज यलगुलवार, अशोक निंबार्गी, संजय हेमगड्डी, जुबेर कुरेशी, यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे बोलताना म्हणाल्या की, भाजपने मागील दहा वर्षात सोलापूरला मागे नेले. आपल्याला त्याचा बदला घेवून सोलापूरला विकासाच्या वाटेवर न्यायचे आहे. तसेच भारतीय जनता पक्षाने जी जाती धर्मात कीड लावली आहे. ती कीड मुळापासून उखडून काढायची आहे. तसेच भाजपला सोलापूरची संस्कृती दाखवून द्यायची आहे. त्यासाठी सर्वांनी एक होऊन मतदान करत सोलापूरच्या लेकीला दिल्लीत पाठवण्यासाठी साथ देण्याचे आवाहन केले.
महालक्ष्मी योजना राबवणार
दरम्यान राहुल गांधी आपल्या भाषणात बोलताना पुढे म्हणाले की, आजच्या २१व्या शतकात महिला आणि पुरुष असे दोघेही काम करतात. आठ-दहा तासांची दोघांचीही नोकरी होते. महिला घर आणि बाहेर अशा दोन्हीकडे आठ-आठ तास काम करतात. घरात जेवण तयार करणे, मुलांचे संगोपन करताना देशाच्या भविष्याचे रक्षण करते. तरीही केवळ आठ तासांचे पैसे मिळतात. घरकामाचे पैसे दिले जात नाहीत. म्हणून महालक्ष्मी योजनेच्या माध्यमातून प्रत्येक गरीब कुटुंबातील महिलेला बळ देणार, त्यासाठी गरीब महिला कुटुंबाची यादी काढून त्यातील कुटुंबप्रमुख महिलांना प्रतिवर्षी एक लाख रुपये खात्यात टाकणार असल्याचे आश्वासनही यावेळी राहुल गांधी यांनी दिले.

तरुणांना लाख रुपयांची अप्रेंटिशशीप
नोटबंदी, जीएसटी लागू करून मोदी सरकारने लूट चालविली. दोन कोटी रोजगार देण्याचे आश्वासन देणाऱ्यांनी बेरोजगारी वाढविली. आज सर्वाधिक बेरोजगारी आपल्या देशात आहे. कोट्यवधी लोक रोजगाराच्या शोधात फिरतात. सधन कुटुंबातील लोकांना ही अडचण नाही. ते ‘अप्रेंटिशशीप’ करतात. सहा महिने, वर्षभराची तात्पुरती नोकरी करतात. हे करण्यासाठी त्यांना पैसे मिळतात. त्यांचा ‘जॉब मार्केट’मध्ये शिरण्याचा त्यांचा मार्ग मोकळा होतो. ही संधी साऱ्यांना मिळत नाही. ते भटकत राहतात. हात जोडतात, विनंती करतात. मोदी काय, कुणीच ऐकत नाही. ही परिस्थिती बदलण्यासाठी आम्ही देशात नवा कायदा लागू करणार. त्यामाध्यमातून आजवर सधन कुटुंबातील मुला-मुलींना मिळणारी अप्रेंटिशशीपची सुविधा प्रत्येक बेरोजगारांना उपलब्ध करून देणार असल्याचे राहुल म्हणाले. या मुलांना सर्व क्षेत्रांत ही सुविधा उपलब्ध होऊन वर्षभराच्या नोकरीची गॅरंटी आम्ही देत आहोत. अवघ्या वर्षभरात आपल्या देशात जगातील सर्वांत मोठी ‘ट्रेंड वर्क फोर्स’ तयार होईल, असा विश्वासही राहुल यांनी व्यक्त केला.
शेतकऱ्यांसाठी कर्ज माफी योजना
शेतकरी मोदी सरकारकडे कर्जमाफी आणि हमीभाव मागत होते. मात्र त्यांनी तो दिला नाही. परंतु शेतकऱ्यांनो तुम्ही चिंता करू नका. महिला, बेरोजगारांना दिले जाणारे एक-एक लाख तुमच्याच घरात येणार आहेत. मोदी सरकारने तुमचे कर्ज माफ केले नाही. आमचे सरकार येताच कर्जमाफी केली जाईल. हे केवळ एकदा नव्हे तर गरज पडेल तेव्हा ही कर्जमाफी दिली जाईल. हे ठरविण्यासाठी विशेष आयोग स्थापन करणार. तो आयोग सांगेल तेव्हा-तेव्हा शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार. जर अब्जाधीशांचे कर्ज माफ होऊ शकते तर गरिबांचे का नाही, असा सवालही राहुल यांनी यावेळी केला. आपल्याकडे पैशांची कमी नाही. अब्जाधीशांच्या गाड्या, घर, विमाने पाहिल्यानंतर हे पटते, असेही ते म्हणाले.
९० टक्के लोकांना सहा टक्केच अधिकार
आपल्या देशातील १५ टक्के दलित, आठ टक्के आदिवासी, ५० टक्के मागासवर्ग, १५ टक्के अल्पसंख्याक, पाच टक्के आर्थिकदृष्ट्या मागास असे ९० टक्के लोक आहेत. माध्यमे, उद्योजकांमध्ये हे कुठेही नाहीत. अदानी, अंबानींसारख्या २०० प्रमुख उद्योजकांच्या कंपन्यांमध्ये वरिष्ठ पदांवर यांच्यापैकी कुणी नाहीत. या कंपन्यांचे मालक दलित, ओबीसी नाहीत. दिल्लीतील सरकार ९० अधिकारी चालवितात. हे आयएएस दर्जाचे असतात. बजेटमधील एक-एक रुपयाचा निर्णय घेतात. रस्ते, रेल्वे, डिफेन्स अशा प्रत्येक क्षेत्रासाठीचा निधी ठरवितात. हे ठरविणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये फक्त एक आदिवासी आहे. ओबीसी आणि दलितांची संख्या प्रत्येकी तीन आहे. म्हणजेच केवळ शंभरातील सहा रुपयांचा निर्णय घेण्याची क्षमता यांच्याकडे असल्याकडेही राहुल यांनी लक्ष वेधले.
‘जीएसटी वरून टीका

राहुल यांनी आपल्या भाषणात जीएसटी चा मुद्दा ही उपस्थित केला. एखादी वस्तू घेणार असाल तर १८ टक्के जीएसटी तुम्ही देता. मात्र इतकाच जीएसटी अदानी, अंबानीही देत असल्याचेही सांगत जीएसटीच्या माध्यमातून सर्वसामान्याचे होणारी लूट कशा पद्धतीने होते याकडेही लक्ष वेधले. तसेच दलित, मागास, अल्पसंख्यांकांचा हा पैसा असतानाही कर्जमाफी फक्त २२ लोकांनाच का दिली गेली, असा सवालही राहुल यांनी केला.

लक्षवेधी…
-शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आयोगाची स्थापना करणार. या आयोगाच्या माध्यमातून ज्या ज्या वेळी कर्जमाफीची गरज असेल त्या त्यावेळी शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार- जितका पैसा ते अब्जाधीशांना देणार, तितका आम्ही शेतकरी, दलित, आदिवासी, मागास वर्ग देणार. – एक लाख बँक खात्यात टाकणार हे सांगताना ‘खट खट खट खट खट पैसा बँकेत येणार असा उच्चार करताच जनतेचा टाळ्यांनी उस्फुर्त प्रतिसाद’ दिला.. – यावेळी भरउन्हातही मोठ्या प्रमाणात नागरिकांची सभेला गर्दी केल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page