भारतीय डाक विभागाच्या सर्व सेवा लोकांच्या दारापर्यंत पोहोचवण्याचे ध्येय : श्री. चंद्रकांत भोर
सांगोला प्रतिनिधी – संतोष येडगे
भारतीय डाक विभागाच्या बँकिंग सेवा, इन्शुरन्स सेवा, मेडिक्लेम इन्शुरन्स सेवा, इंडिया पोस्ट पेमेंट बॅंकेच्या सेवा आदी प्रकारच्या सेवा ग्राहकांच्या दारापर्यंत पोहोचवण्याचं काम पंढरपूर डाक विभागाच्या माध्यमातून केले जात असल्याचे प्रतिपादन पंढरपूर डाक विभागाचे अधीक्षक श्री चंद्रकांत भोर यांनी डाक कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम (DCDP) मध्ये सांगोला गुरुकुल सांगोला या ठिकाणी आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये केले. डाक कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम हा भारत सरकारने पोस्टाच्या विविध बचतीच्या योजनांबाबत नागरिकांना अर्थसाक्षर करण्याच्या हेतूने दर महिन्यातून एक दिवस या कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे.या कार्यक्रमासाठी इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे मॅनेजर श्री विनायक पासंगराव, मंगळवेढा डाक उपविभागाचे डाक निरीक्षक हनुमंत चव्हाण, सांगोला पोस्ट ऑफिसचे पोस्टमास्तर श्री सोमनाथ गायकवाड, पोलीस खात्यातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्री. खरात साहेब आणि श्री. मोरे साहेब आणि सांगोला गुरुकुलचे संस्थापक अध्यक्ष मा. बोराडे सर आणि गाडेकर सर उपस्थित होते.यावेळी मनोगत व्यक्त करताना एपीआय खरात साहेब व मोरे साहेब यांनी भारतीय डाक विभागाचे जनतेशी असणारे अतूट नातेसंबंधांबाबत त्यांच्या आयुष्यातील आठवणी सांगून पोस्ट ऑफिसच्या आठवणी आणि सेवेची महती सांगितली.सांगोला पोस्ट ऑफिसचे पोस्टमास्तर श्री सोमनाथ गायकवाड यांनी बोलताना सांगितले की, “आज बचत केलेला पैसा हा भविष्यामध्ये मिळवलेला पैसा असतो”. त्यामुळे पोस्ट ऑफिस च्या योजना मध्ये पैसे गुंतवण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे असे आवाहन केले. गायकवाड यांनी पुढे बोलताना सांगितले की, महिलांसाठी महिला सन्मान बचत पत्र योजना, मुलींसाठी सुकन्या समृद्धी योजना, मुलांसाठी पब्लिक प्रॉव्हिडंट फंड ,सर्व प्रकारच्या बचतीचे व्यवहार करण्यासाठी पोस्ट ऑफिस बचत खाते आणि इंडिया पोस्ट पेमेंटचे डिजिटल बँकिंगचे खाते याबाबत माहिती सांगितली. बचतीचे आणि गुंतवणुकीचे महत्त्व विशद करत असतानाच जीवन व्यवहारातील उदाहरणे देत मानवी जीवनामध्ये भविष्यात येणार्या आर्थिक संकटांवरती मात करण्यासाठी अल्पकालीन आणि दीर्घकालीन गुंतवणूक करण्याचे फायदे सांगून पोस्ट ऑफिसचा डाक विमा आणि ग्रामीण टपाल जीवन याबाबतही विवेचन आपल्या भाषणामधून केले.त्याचबरोबर मंगळवेढा डाक विभागाचे निरीक्षक श्री हनुमंत चव्हाण यांनी मंगळवेढा व सांगोला तालुक्यामध्ये असणाऱ्या पोस्टाच्या गावापर्यंत पोहोचलेल्या नेटवर्कच्या माध्यमातून पोस्टाच्या सेवांचा लाभ नागरिकांनी घ्यावा अशा प्रकारचा आवाहन केले. या कार्यक्रमाला सांगोला गुरुकुल चे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डाक आवेक्षक श्री राम कुलकर्णी आणि श्री. संतोष खाणे यांनी परिश्रम घेतले.